Sangli News : येरळाकाठी वादळाने आंबा पिकाची हानी
किरण निकम
निंबळक : तासगाव तालुक्यातील येरळा काठावर वादळी वाऱ्याने आंबा पिकाला फटका बसला आहे. भागातील आंब्याच्या बागा तसेच बांधावरील झाडे वाऱ्याने जमीनदोस्त झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बदला आहे.
येरळा काठावर चिखलगोठण, निंबळक, आळते, बोरगाव, वाझर, राजापूर, तुरची, मोराळे भागात उन्हाळयात येणाऱ्या आंब्यांच्या झाडांचा मोहोर आणि कैरी गळण्याचे प्रमाण वाढते आहे. वाढलेल्या उष्णतेचा हा परिणाम असल्याची माहिती चिखलगोठण येथील आंबा उत्पादक शेतकरी शंकर नाना पवार यांनी दिली. यातच वादळी वाऱ्याने या आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी 15 फेब्रुवारी पासूनच उष्णता तापमान झपाट्याने वाढली आहे. मागच्या वर्षी 1 मार्चला साधारण 32 अंश सेल्सिअस तापमान होते. यावर्षी हेच तापमान 38 इतके झाले. आंब्याच्या झाडांचा मोहर टिकून राहिला नाही. फलधारणा होत नाही. फलधारणा झाली तरी फळे गळू लागली. परिणामी वसंत ऋतु म्हणजे हमखास फलधारणा निर्माण करणारा ऋतू आहे; पण हाच ऋतू हवामानातील वाढत्या उष्णतेने कुचकामी ठरत आहे.
दरम्यान, येथील शंकर नाना पवार यांनी आपल्या शेतात पाच एकरातून दोन हजार झाडे लावली. पण फलधारणा कैरीच्या आंब्याने गळून पडते आहे. यावर उपाय म्हणून उष्णता सहन करता यावी यासाठी त्यांना आता फळांना कापड कागद किंवा प्लास्टिक गुंडाळावे लागणार आहे. पवार यांची पाच एकर केशर कलमी आंब्याची बाग आहे. देशी मोठया झाडांनाही या वाढत्या उष्णतेचा फटका बसू लागाला आहे. सध्या त्यांनी बागेत आठरा बाय पाच फुटाचे अंतर ठेवून दोन हजार झाडे लावली आहेत. सलग तिसऱ्या वर्षी वादळी वाऱ्याचा फटका बसत असून आंबा शेती परवडेनाशी झाली आहे. चालू हंगामात अगोदरच फुलोरा कूज झाली नंतर वादळी वारे यामुळे जवळपास बाजारपेठेतील पाच ते साडेपाच लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. विजांसह येणारा पाऊस, वादळवारा यामुळे शेतीचे नुकसान होतेच आहे. वाढत्या उष्णतेनेच फळबागांच्या मोहोरांना धक्का बसत आहे. तर फळांचे उन्हाळी वादळी वाऱ्याने नुकसान होऊ लागले आहे.

