

जत : येळदरी (ता. जत) येथे डांबरी रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महिबूब रज्जाक पटेल (वय ३६, रा. बिळूर, ता. जत) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवार, दि. ५ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा अपघात घडला.
जत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, महिबूब पटेल हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० ईएक्स २३८६) बिळूरकडे जात होते. ते येळदरी गावाजवळ डांबरी रस्त्यावर आले असता, एका अज्ञात वाहनावरील चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी होऊन महिबूब पटेल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला.
याप्रकरणी महिबूब यांचा भाऊ शानुर रज्जाक पटेल (वय ३९, रा. बिळूर) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास जत पोलिसांचे पथक करीत आहे.