

सांगली : येथील कॉलेज कॉर्नर परिसरात सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही आवश्यक उपाययोजना न केल्याने घडलेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला. लक्ष्मण इराप्पा वडर (वय ४८, रा. सर्वोदय शाळेजवळ, वडर कॉलनी, सांगली) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात इमारतीचे बिल्डर व कॉन्ट्रॅक्टर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहल शशिकांत मोरे यांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कॉलेज कॉर्नर येथील आर्या पान शॉपजवळ विक्रम ठाणेदार यांच्यामार्फत नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता कामगारांकडून धोकादायक स्थितीत काम करून घेतले जात होते.
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काम करत असताना कामगार लक्ष्मण वडर यांचा अचानक तोल गेला आणि ते थेट खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी सुरक्षेकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणा केल्याप्रकरणी इमारतीचे बिल्डर विक्रम ठाणेदार (रा. कोल्हापूर) आणि कॉन्ट्रॅक्टर प्रकाश रामचंद्र चौधरी (वय ५०, रा. वडर कॉलनी, सांगली) यांच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.