

कुरळप : येलूर (ता. वाळवा) येथील माळवाडी परिसरात शनिवारी महिलेचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली. निर्मला पांडुरंग पवार (वय ५५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पवार यांना दोन मुले असून, त्यापैकी एक मुलगा पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे, तर दुसरा मुलगा व्यवसाय करतो. पती केशव पांडुरंग पवार हे दोन वर्षांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्स कंपनीतून निवृत्त झाले आहेत. दरम्यान, शनिवारी दुपारी मुलगा किरण पवार हा जेवायला घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्याने तत्काळ जखमी अवस्थेत असणाऱ्या आई निर्मला यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे समजते. मात्र, त्या मृत झाल्याचे सांगण्यात आले.
ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिस ठाण्याचे स.पो.नि. भरत पाटील यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.