

ईश्वरपूर : येथे पैशांच्या देवाणघेवाणीवरून एका महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी संशयित शिवम प्रभाकर कुकडे (रा. यल्लम्मा चौक, ईश्वरपूर) याच्याविरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवम कुकडे आणि पीडित महिला यांची एकमेकांशी ओळख होती. शिवमने आपल्या आजीच्या उपचारासाठी महिलेकडे २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मागितली होती. त्यावेळी महिलेकडे रोख रक्कम उपलब्ध नसल्याने तिने स्वतःच्या कानातील अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची वेल बँकेत गहाण ठेवून २५ हजार रुपये काढून त्याला दिले होते. तीन महिन्यांत वेल सोडवून परत आणून देण्याचे आश्वासन शिवमने दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही त्याने ती वेल परत आणून दिली नाही.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित महिला दुचाकीवरून जात असताना शिवम तेथे दुचाकीवरून आला. त्यावेळी पीडित महिलेने, ‘माझी वेल कधी सोडवून देणार?’ अशी विचारणा केली. याचा राग आल्याने शिवमने महिलेशी अश्लील भाषेचा वापर करत असभ्य वर्तन केले. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत तेथून पलायन केले. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.