

आटपाडी : पंढरपूर ते झरे मार्गावर झरे हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ मोटारीने पाठीमागून दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर गंभीर जखमी महिलेला कोणतीही वैद्यकीय मदत न देता चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता घडली. या प्रकरणी संशयित चालक संतोष तुळशीदास साळुंखे (रा. सोलापूर) याच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फळवणी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील सुलचंद सदाशिव लोखंडे (वय ४३) हे २१ रोजी पत्नी शीतल (वय ३८) यांच्यासह दुचाकीवरून (क्र. एमएच १३ डब्ल्यू ४७२८) झरेमार्गे वासुंबे येथे देवदर्शनासाठी जात होते. झरे हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव मोटारीने (एमएच २४ व्ही ४६९९) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात शीतल या गंभीर जखमी झाल्या. अपघात घडताच मोटारचालक जखमींना मदत न करता वाहनासह पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या शीतल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सुलचंद लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेली मोटार तसेच दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.