

आटपाडी : चार तरुणांच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून करगणी (ता. आटपाडी) येथे सायली महादेव सरगर (वय 16) या युवतीने सोमवारी गळफास घेऊन जीवन संपवल्याचे उघड झाले. यानिषेधार्थ ग्रामस्थांनी मंगळवारी गावात कडकडीत बंद पाळला.
घटनेबाबत रात्री मुलीचे वडील महादेव भिकाजी सरगर यांनी पोलिसात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात (सर्व रा. करगणी), अनिल नाना काळे (रा. बनपुरी) यांच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संशयित राजू गेंड याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. रामदास गायकवाड याला ग्रामस्थांनी मारहाण केल्याने त्याच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत. संशयित रोहित खरात व अनिल काळे फरार आहेत. करगणी येथील सायली हिला संशयितांनी शाळेत येताना-जाताना वेळोवेळी मानसिक त्रास दिला होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने सोमवारी सकाळी राहत्या घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला. उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक बहिर, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयितांचे मोबाईल पोलिसांच्या हाती लागले आहेत.