

पलूस ः गैरवर्तणुकीची तक्रार केल्याच्या रागातून पलूस येथे एका बँकेच्या सेवा केंद्रातील कर्मचार्याने महिला सहकार्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात स्नेहल सुशांत कोले (वय 35, रा. विद्यानगर कॉलनी, पलूस) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी विश्वजित पोपट पिसाळ (रा. विद्यानगर कॉलनी, पलूस) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवार, दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजता घडली पलूस पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हल्लेखोरास अटक केली.
पलूस पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पलूस येथील बस स्थानकासमोर एका बँकेचे सेवा केंद्र आहे. स्नेहल कोले व संशयित विश्वजित पिसाळ हे दोघेही संबंधित सेवा केंद्रात काम करतात. स्नेहल कोले यांनी दोन दिवसांपूर्वी विश्वजित पिसाळ याच्या गैरवर्तणुकीविषयी वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली होती. यानंतर वरिष्ठांनी विश्वजित याला बोलावून घेऊन समज दिली होती. यामुळे विश्वजितला याचा राग होता. गुरुवारी तो चाकू घेऊनच कार्यालयात आला आणि रागाच्या भरात त्याने स्नेहल यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात स्नेहल यांच्या गळ्यावर, हनुवटीवर व छातीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. सहकार्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत विश्वजित याला रोखले आणि जखमी स्नेहल यांना सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी स्नेहल यांचे पती सुशांत अशोक कोले (वय 37) यांनी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित विश्वजित पिसाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित पिसाळ याला तत्काळ ताब्यात घेतले. पलूस पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.