

कासेगाव : तांबवे (ता. वाळवा) येथे राहत्या घरी झोपेतच विषारी सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. वंदना अनिल जाधव (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
वंदना जाधव या तांबवे येथे कासेगाव रस्त्यावरील शेतातील घरी राहत होत्या. नेहमीप्रमाणे जेवण करून त्या कुटुंबासोबत झोपी गेल्या होत्या. रात्री १ वाजण्याच्या सुमारास अतिविषारी घोणस जातीच्या सर्पाने त्यांना दंश केल्याने त्यांना जाग आली. त्यांनी तातडीने पती अनिल व मुलगी अमरजा यांना जागे करून याबाबत माहिती दिली. त्यांना उपचारासाठी कराड येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्या प्रगतशील शेतकरी अनिल जाधव यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.