Sangli Jewellery Theft: सांगलीत महिलेकडून दोन सराफांना गंडा

खरेदीच्या बहाण्याने ८७ हजारांचे दागिने लंपास
Sangli Jewellery Theft: सांगलीत महिलेकडून दोन सराफांना गंडा
pudhari photo
Published on
Updated on

​सांगली : शहरातील कापडपेठ व गवळी गल्ली परिसरातील दोन नामांकित सराफी दुकानांमधून एका महिला चोरट्याने शिताफीने ८७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील रिंगाजोड लांबवले. या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बायपास रोड येथील रहिवासी व सराफ व्यावसायिक जयेश कांतीलाल मेहता (वय ५०) यांनी या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सुमारे ३० वर्षे वयाची, चॉकलेटी रंगाचा चुडीदार परिधान केलेली आणि तोंडाला काळा मास्क लावलेली एक महिला 'मेहता ज्वेलर्स' या दुकानात आली. तिने दागिने खरेदीचा बहाणा करत दुकानदाराची नजर चुकवून ४५ हजार रुपये किमतीचे ३.८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंगाजोड लांबवले.

यानंतर लगेचच, दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास गवळी गल्ली येथील फिर्यादींचे मित्र शोयब लतिफ मुल्ला यांच्या 'एस. एम. ज्वेलर्स' या दुकानाला लक्ष्य केले. तेथेही तिने नजर चुकवून ४२ हजार रुपये किमतीचे ३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंगाजोड चोरून पोबारा केला. दोन्ही दुकानांमधून मिळून एकूण ८७ हजार रुपयांचे ७.३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने या चाणाक्ष महिला चोरट्याने लांबवले आहेत. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी अज्ञात महिला चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news