.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कुपवाड :वारसाहक्काने मिळालेली जागा व बांधीव घर विक्री करण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ६ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरिता किसन गाडे (वय ३८, रा. ग्रीन पार्कजवळ, साई कॉलनी, कुपवाड; सध्या रा. बौद्ध विहाराच्या पाठीमागे, आरोळे, ता. तासगाव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित महंमद शमशुद्दीन मुजावर (वय ५०) व सरफराज शमशुद्दीन मुजावर (वय ४०, दोघे रा. उल्हासनगर, कुपवाड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
१४ ऑक्टोबर २०२५ रोजी संशयित महंमद मुजावर व सरफराज मुजावर यांनी महंमद बानू मुजावर यांच्याकडून वारसाहक्काने मिळालेली महानगरपालिका हद्दीतील जागा व बांधीव घर अडचण असल्याने सरिता गाडे यांना ६ लाख ९० हजार रुपयांना विकण्याचे ठरवले होते. त्यानुसार संशयितांनी गाडे यांच्याकडून धनादेशाद्वारे ही रक्कम स्वीकारली. मात्र, पैसे घेतल्यानंतरही संशयितांनी जागा खरेदी करून देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरिता गाडे यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.