

सांगली : येथील गोकुळनगर परिसरात जुन्या गुन्ह्याच्या रागातून एका महिलेवर धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मधू लखन इसरडे (वय 38, रा. सांगली) असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहे. या खून हल्ल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, मुख्य संशयित पसार आहे. गणेश राजेंद्र मडे (रा. कुपवाड रोड, लक्ष्मी मंदिर जवळ) याने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली.
अशोक किसन इंगळे (वय 35 रा. अलिशान कॉलनी, कुपवाड), बशीर बाळू मुल्ला (45 रा. वडर कॉलनी, सांगली) आणि नितीन बाळू ठोकळे (33 रा. नवीन वसाहत) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत, तर मुस्ताक सामनेवाले हा पसार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी मधू इसरडे या गोकुळनगर परिसरात राहतात. मंगळवारी रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी गणेश मडे यांना मधू इसरडे यांच्यावर हल्ला झाल्याचा दूरध्वनी आला. गणेश याने तत्काळ गोकुळनगर गाठले. यावेळी मधू इसरडे या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांना तातडीने रिक्षातून सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्यात, पोटात धारदार हत्याराने वार करण्यात आले. संशयित चौघांनी हल्ला केल्याची फिर्याद मडे याने विश्रामबाग पोलिसांत दिली. जुन्या गुन्ह्याच्या वादातून घरात घुसून हल्ला केल्याचे सांगितले.
दरम्यान, खुनी हल्ल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक प्राणिल गिल्डा, पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने तपासाची चक्रे फिरविली. संशयित अशोक इंगळे, बशीर मुल्ला आणि नितीन ठोकळे या तिघांना 12 तासांत ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, सहायक निरीक्षक कविता नाईक, कर्मचारी बिरोबा नरळे, संदीप साळुंखे, अमर मोहिते, संदीप माने, प्रशांत माळी, महंमद मुलाणी, आर्यन देशिंगकर, शिवाजी ठोकळ यांच्या पथकाने केली.