Sangli Crime: तीन राज्यांत चोऱ्या करणाऱ्या महिलेस अटक

साडेदहा लाखांचे दागिने जप्त; मिरज बस स्थानकातील गुन्हा उघड
Women Arrested
Women Arrestedfile
Published on
Updated on

​सांगली : गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या परराज्यातील सराईत गुन्हेगार महिलेस सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. मोनीषा मणीगंडण (वय २८, रा. जोलार पेठ, बाबुनगर, जि. वेल्लोर, तामिळनाडू) असे या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी १० लाख २८ हजार रुपये किमतीचे ६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गस्तीवर होते. यादरम्यान, सांगली एस. टी. स्टँडच्या पाठीमागील दोन नंबर गल्लीत एक संशयित महिला पर्स घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याजवळील पर्समध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आढळून आले. यात मोठे गंठण, मिनी गंठण, सोन्याचे झुबे, अंगठ्या आणि रोख रक्कम होती. पोलिसांनी या दागिन्यांबाबत चौकशी केली असता, तिने मार्च महिन्यात मिरज एस. टी. स्टँडवर प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन लक्ष्मी रामगोडा रोगे (रा. ब्रम्हनाळ, ता. पलूस, जि. सांगली) या महिला प्रवाशाच्या पर्समधून हे दागिने चोरल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेली संशयित महिला मोनीषा मणीगंडण ही रेकॉर्डवरील सराईत आंतरराज्य गुन्हेगार आहे. तिच्यावर यापूर्वी तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सांगली पोलिसांनी पुढील तपासासाठी संशयित महिला व जप्त केलेला मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news