Sangli Whale Vomit Seized: व्हेल माशाची साडेचार कोटींची उलटी जप्त

एका संशयिताला अटक
Sangli Ambergris Seized
Sangli Ambergris Seized: व्हेल माशाची साडेचार कोटींची उलटी जप्तPudhari
Published on
Updated on

​सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील बागणवाट रोडवर ग्रिन पार्क प्लॉटींगजवळ सांगली ग्रामीण पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल ४ कोटी ५२ लाख १० हजार रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रिस) जप्त केली आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील दुचाकीही जप्त केली आहे.

​अमोल आकाराम सिद (वय ३२, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर त्याला हा माल पुरवणारा निखिल (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू आहे.

याबाबत माहिती अशी , २९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कसबे डिग्रज हद्दीतील शक्ती पॉलिमर्स कंपनीच्या पाठीमागील बाजूस बागणवाट रोडवर एक व्यक्ती प्रतिबंधात्मक अंबरग्रिसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सांगली ग्रामीण पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित अमोल सिद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ किलो ५२१ ग्रॅम वजनाचा अंबरग्रिस सदृश पदार्थ आणि मोटारसायकल ( एमएच ०९ एफझेड ७२६८) जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस हवालदार महेश जाधव यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, पोउपनि शिवाजी देशमुख, वनपाल सुधीर सोनवले, वनरक्षक गणेश भोसले व पथकाने केली.

अंबरग्रिसचा उपयोग यासाठी होतो...

​सुगंधित द्रव : महागड्या, अत्तर व परफ्यूममध्ये सुगंध दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी अंबरग्रिसचा वापर केला जातो.

​पारंपरिक औषधे : काही देशांमध्ये पारंपरिक आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये, विशेषतः मज्जासंस्था आणि पचनक्रियेशी संबंधित उपचारांत याचा घटक म्हणून वापर होतो.

वैज्ञानिक संशोधन : सागरी जीवशास्त्र आणि दुर्मिळ रासायनिक घटकांच्या अभ्यासासाठी संशोधन क्षेत्रात याला महत्त्व आहे.

​दुर्मिळता आणि मूल्य : स्पर्म व्हेल माशाच्या पचनसंस्थेतून तयार होणारा हा पदार्थ अत्यंत दुर्मिळ असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात याला ‘तरंगते सोने’ म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news