

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचा सांगलीत आगमन सोहळा उत्साहात पार पडला. मिरज ते सांगली अशी भव्य रॅली रविवारी सायंकाळी काढण्यात आली. चौका-चौकात पुष्पवृष्टी करून क्रेनच्या साहाय्याने मोठ-मोठे हार पुतळ्याला घालण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. चौका-चौकात रांगोळी घालण्यात आली होती.
मिरजेतील महात्मा गांधी चौकातून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चौदाफुटी पुतळा ट्रकमध्ये ठेवण्यात आला. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, आमदार इद्रिस नायकवाडी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बुध्दवंदना करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत चित्ररथ देखावे सहभागी होते. जयंती महोत्सवाच्या अध्यक्षा स्नेहल सावंत, सचिव बीरेंद्र थोरात, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेवक सचिन सावंत, रमाकांत घोडके, प्रफुल्ल ठोकळे, प्रियानंद कांबळे, विज्ञान माने, अनिल साबळे, सुरेश चौधरी उपस्थित होते.
यानंतर विश्रामबाग चौक, पुष्पराज चौक, राममंदिर चौक आदी ठिकाणी विविध संस्था, संघटना, कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. काँग्रेस भवनसमोर काँग्रेसच्यावतीने क्रेनच्या साहाय्याने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक उपस्थित होते. स्टेशन चौकात मुस्लिम बांधवांकडून रॅलीचे स्वागत करण्यात आले.