Sangli Railway : सांगली रेल्वे स्थानकाच्या विकासाचा मार्ग मोकळा

सरकता जिना व प्रतीक्षालये सुरू करण्याचे आदेश; रेल्वे समितीच्या बैठकीत साखळकर यांची मांडणी
 Railway News |
Railway News : File Photo
Published on: 
Updated on: 

सांगली : पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या गुरुवारी (दि. २६) पार पडलेल्या बैठकीत सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, स्थानक विकास, नवीन गाड्या आणि गाड्यांच्या विस्तारीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत सांगली स्थानकावरील सरकत्या जिन्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आणि सर्व प्रतीक्षालये खुली ठेवण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. तसेच, माधवनगर येथील रेल्वे पूल क्रमांक ५०३ च्या हस्तांतरणाचे आदेशही देण्यात आल्याची माहिती सल्लागार समितीचे सदस्य सतीश साखळकर यांनी दिली.

माधवनगर येथील पूल क्रमांक ५०३ तातडीने हस्तांतरित करण्याचे आदेश मिळाल्याने तेथील रस्त्याची दुरुस्ती आणि विद्युत खांब उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सांगली शहराचे व्यापारी, औद्योगिक व प्रादेशिक महत्त्व आणि सुमारे २१ कोटी रुपयांचे वार्षिक प्रवासी उत्पन्न विचारात घेता, सांगली स्थानकाचा दर्जा 'एनएसजी-२' श्रेणीत उन्नत करण्याची मागणीही साखळकर यांनी बैठकीत लावून धरली.

गाड्यांच्या विस्तारीकरणाचा मुद्दा ऐरणीवर

पुणे-मिरज दुहेरी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होऊनही अपेक्षित प्रमाणात गाड्या वाढलेल्या नाहीत. दुहेरीकरणामुळे नेमक्या किती गाड्या आणि उत्पन्न वाढले, याचा हिशेब मांडण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. सांगलीतून नवीन गाड्या सुरू करणे आणि पुण्यापर्यंत धावणाऱ्या गाड्यांचा मिरज व सांगलीपर्यंत विस्तार करण्यास प्रशासन अनावश्यक कारणे देऊन विलंब करत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

भवानीनगर थांबा पूर्ववत करण्याच्या सूचना

पूर्वी भवानीनगर येथे काही गाड्यांना थांबा होता. हा थांबा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर आवश्यक बाबी तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.