सांगली : थकित पाणीपट्टी भरलेल्या गावांचा पाणीपुरवठा सुरू

कुंडल प्रादेशिक योजना : पलूस, सावंतपूर, रामानंदनगरचा समावेश; पावणेतीन कोटी वीजबिल, पावणेचार कोटी थकबाकी
water supply resumed
सांगली : थकित पाणीपट्टी भरलेल्या गावांचा पाणीपुरवठा सुरूpudhari photo
Published on
Updated on
पलूस : तुकाराम धायगुडे

नवीन वर्षाच्या तोंडावर तालुक्यातील कुंडल प्रादेशिक योजनेचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने पुन्हा खंडित केला होता. योजनेवरील थकित रक्कम वाढत असल्याने वीज खंडित करण्यात आली होती. पलूस, सावंतपूर व रामानंदनगर या गावांनी काही थकित रक्कम भरल्याने त्यांचा पाणीपुरवठा सुरू केला आहे, परंतु उर्वरित गावांमध्ये अजूनही पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे या गावांतील महिला वर्गाला पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

कुंडल प्रादेशिक योजना फार जुनी योजना आहे. या योजनेवर पलूस तालुक्यातील जवळपास 13 गावे व वाड्या-वस्त्यांना पिण्याचा पाणीपुरवठा करण्यात येतो. ही योजना जुनी असल्याने मध्यंतरी या योजनेचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र, या योजनेच्या वीज बिलाची रक्कम जवळपास पावणेतीन कोटींच्या दरम्यान आहे. थकित रक्कम भरण्याच्या सूचना मागील काही महिन्यांपासून महावितरणकडून दिल्या जात आहेत. इतकी मोठी रक्कम एकदम भरणे शक्य नसल्याने प्रत्येक गावाकडून वसुली झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने ही रक्कम महावितरणला भरणे गरजेचे होते, परंतु वसुली नसल्याने रक्कम भरली जात नाही. त्यामुळे ‘महावितरण’कडून विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.

पलूस तालुक्यातील 13 गावांना कुंडल प्रादेशिक नळपाणी योजनेतून आठवडाभर पाणीच नाही, अशी परिस्थिती आहे. तालुक्यातील बहुतांश गावांतील ग्रामपंचायत व नगरपालिका यांनी पाणीपट्टी न भरल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी नवीन वर्षात वेळेवर पाणीपट्टी भरली नाही तर पाण्याचा ठणठणाट अधुनमधून सुरूच राहणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

कुंडल प्रादेशिक योजनेत पलूस शहरासह दुधोंडी, कुंडल, बुर्ली, रामानंदनगर, किर्लोस्करवाडी, सावंतपूर, आमणापूर, पुणदी, पुणदीवाडी, तुपारी, दुधारी, नागराळे, माळवाडी, घोगाव यांचा समावेश होतो. तालुक्यातील एखाद्दुसरी ग्रामपंचायत वगळता अनेक ग्रामपंचायतींची लाखो रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे पुरवठा योजनेची दिवसेंदिवस थकबाकी वाढतच चालली आहे. गावातील ग्रामपंचायत कर्मचारी घरोघरी वसुलीसाठी फिरताना दिसत आहेत. अनेक गावांनी पाणीपट्टीची रक्कम वेळेवर दिली नाही. त्यामुळे या योजनेची वीजबिल थकबाकी वाढतच आहे. सहा महिन्यांपूर्वी 1 कोटी 95 लाख असणारी विजेची थकबाकी 2 कोटी 75 लाखांवर पोहोचली आहे. या 13 गावांतील मोजक्याच गावांनी पाणीपट्टी दिली. मात्र अन्य गावांनी पाणीपट्टीची रक्कमच दिली नसल्याने बिलाची फूग वाढत गेली आहे. कुंडल योजनेची पाणीपट्टीची एकूण थकबाकी 3,71,91,033 इतकी आहे.

योजना सौरऊर्जेवर चालवावी

‘कुंडल प्रादेशिक’ ही बरीच जुनी योजना आहे. पलूस तालुक्यातील 13 गावे व वाड्यांवर या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, येणारे वीज बिल व योजनेतून होणारी पाणीपट्टी आकारणी याचा ताळमेळ घालणे शक्य नसल्याने वेळोवेळी ही योजना थकित वीज बिलासाठी बंद असते. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी टंचाई निधीतून वीज बिल भरून योजना सुरळीत ठेवली होती, मात्र आता वीज बिल मोठ्या प्रमाणावर थकित आहे. त्यामुळे ही योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

गुरुवारी पंचायत समितीच्या माध्यमातून 8 लाख 30 हजार रुपये थकित बिल भरले आहे. ही तात्पुरती तरतूद आहे. या योजनेतील 13 गावांतील ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वाढ करायला हवी. ग्रामपंचायतीकडे जमा झालेली 90 टक्के रक्कम जमा केली तरच मेळ बसेल; अन्यथा ये रे माझ्या मागल्या, अशीच अवस्था होईल.

अरविंद माने, गटविकास अधिकारी, पलूस पंचायत समिती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news