Sangli Water Scarcity| पलूस तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

पाझर तलावांची पाणीपातळी घटली; रब्बी हंगाम संकटात
Sangli Water Scarcity
पलूस तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र
Published on: 
Updated on: 

तुकाराम धायगुडे

पलूस : तालुक्याला यंदा कमी पावसामुळे पाणीटंचाईच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. आमणापूर, दुधोंडी, भिलवडीसह पूर्व भागातील पलूस, बांबवडे, मोराळे आणि आंधळी परिसरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. विहिरींची पाणीपातळी खालावली असून, यंदा प्रथमच कृष्णा नदीचे विस्तीर्ण पात्र ओसाड पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रात काही प्रमाणात पाणी दिसू लागले आहे. मात्र, नदीकाठावरील वीजपंपांच्या फ्युज महावितरण विभागाने काढल्यामुळे शेतकऱ्यांना नदीतून पाणी उपसा करता येत नाही. नदीकाठची बहुतांश शेती कृष्णा नदीच्या पाण्यावर, तसेच सिंचन व्यवस्थेवर अवलंबून आहे. या भागात विहिरींची संख्या तुलनेने कमी असल्याने नदीतील पाणी कमी होणे आणि उपशावर मर्यादा येणे, याचा थेट फटका पिकांना बसत आहे. त्यामुळे नदीकाठची सुपीक शेतीही टंचाईच्या विळख्यात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.

पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर

पावसाअभावी केवळ शेतीच नव्हे, तर गावोगावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पलूसमधील इंगळे पाझर तलाव, धुमके पाझर तलाव आणि बांबवडे तलाव यांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. या तलावांवर परिसरातील शेती, विहिरी आणि बोअरवेल अवलंबून आहेत. तलावांमधील पाणी कमी होत असल्याने भूजलपातळीही खालावत चालली आहे.

परिणामी, आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना अधिक संघर्ष करावा लागू शकतो. कृष्णा कालवा आणि आरफळ कालव्याद्वारे होणारा पाणीपुरवठा कितपत सुरू राहणार, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि सिंचनासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास पलूस तालुक्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता

यंदा खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. आता रब्बी हंगामासाठी पुरेसा पाऊस झाला नाही, तर पेरणी आणि पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून, अनेक भागांत ऊसतोड सुरू आहे. मात्र, ऊसतोडीनंतर पुढील पिकांसाठी पाणी उपलब्ध होणार का, हा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.