Sangli News : पाणी अडवल्याने मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल

कालवा समितीच्या बैठकीत खासदार, आमदार आक्रमक; नदी बारमाही ठेवणार : जलसंपदामंत्री
Sangli News : पाणी अडवल्याने मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल
Published on: 
Updated on: 

सांगली : कोणाच्या तरी सांगण्यावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग बंद ठेवल्यामुळे कृष्णा नदीचे पात्र पार कोरडे पडले आहे. यापुढे हा मनमानी कारभार अजिबात चालणार नाही; पाणी कधी आणि किती सोडायचे हे ठरवणारे हे कोण, अशा शब्दांत कालवा समितीच्या बैठकीत सांगली जिल्ह्यातील आजी-माजी खासदार व आमदारांनी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

या संतप्त प्रतिक्रियांची गंभीर दखल घेत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यापुढे असा प्रकार घडणार नाही आणि कृष्णा नदी सतत प्रवाहित राहील, असे स्पष्ट आश्वासन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कालवा समितीच्या बैठकीत कृष्णा नदी कोरडी पडल्याचा मुद्दा कमालीचा गाजला. लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले.

खासदार विशाल पाटील म्हणाले, नदीपात्र कोरडे पडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, नदीपात्रात मुले आता क्रिकेटचे सामने खेळू लागली आहेत. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असताना नदीपात्र कोरडे राहणे अयोग्य आहे. सांगली जिल्ह्यासाठी ६४ टीएमसी पाणी मिळायलाच हवे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. माजी खासदार संजय पाटील यांनी पाण्यावर कोणाचीही एकाधिकारशाही चालणार नाही आणि हा अन्याय सांगलीकर अजिबात सहन करणार नाहीत, असा इशारा देत त्यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.

आमदार जयंत पाटील म्हणाले, धरणात पाणी असूनही नदीपात्र कोरडे पडण्याचा प्रकार गेल्या ४० वर्षांत कधीही घडला नव्हता. नदीचे पात्र कायम प्रवाहित राहिले पाहिजे. अधिकाऱ्यांनी केवळ जलसंपदा मंत्र्यांच्याच सूचनांचे पालन करावे, इतर कोणाच्याही सांगण्यावरून पाणी रोखू नये. तसेच, वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे २५ टीएमसी पाणी दुष्काळी भागासाठी वळवावे आणि २८ फेब्रुवारीपर्यंत नदीकाठावरील शेतीची वीज तोडू नये.

आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सिंचन योजनांचे बंद पडलेले पंप तातडीने दुरुस्त करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांची पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्यात यावी. आमदार अरुण लाड म्हणाले, कोयना धरणातून साडेदहाशे क्युसेक पाणी कायमस्वरूपी नदीपात्रात सोडण्यात यावे. आमदार सुरेश खाडे म्हणाले, वीज विकत घेता येऊ शकते; पण पाणी विकत घेता येत नाही. त्यामुळे वीजनिर्मितीचे पाणी दुष्काळी भागासाठी वळवले पाहिजे.

आमदार सुहास बाबर म्हणाले, यंदा वीजनिर्मितीचे पाणी सिंचनासाठी देऊन राजवाडी येथील तलाव भरून घ्यावा. साऱ्या पिकांसाठी वीज व पाणी उपलब्ध करून द्यावे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, धरणातील गाळ उपशाचा खर्च महामंडळाने करावा आणि पूर्व भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवावे. आमदार रोहित पाटील म्हणाले, पूर्व भागातील द्राक्ष पिके जगवणे अत्यंत महत्त्वाचे असून, कारळी धरणातून वेळेवर पाणी मिळाले पाहिजे. तसेच, येरळा नदीपात्रातही पाणी सोडावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.