सुनील पाटील
ऐतवडे बुद्रुक : वारणा दूध संघाच्या अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतून वाळवा, शिराळा तालुक्यांतील वारणेच्या संलग्न असणाऱ्या दूध संस्थेच्या उत्पादकांच्या चाळीस हजार मृत पशुधनास सुमारे दीड कोटी रुपयांचा लाभ मिळाला. त्यामुळे वारणा पट्ट्यातल्या दूध उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
वारणा दूध संघाच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी प्रति म्हैस, गाय पाचशे रुपयांचा विमा उतरवला आहे. या विम्यातून पशुधनाला दगाफटका झाल्यास त्या दूध उत्पादकाच्या पशूला सुमारे एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळाले आहे.यातून आजवर वारणा दूध संघास दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थांच्या उत्पादकांना सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक विम्याच्या माध्यमातून लाभ झाला. यापुढे पशुधनाच्या जपणुकीसाठी उत्पादकाच्यादृष्टीने विमा हा पशुपालकांना कवच ठरत आहे.
पशुधन संख्येच्या वाढीसाठी दिवसेंदिवस बाजारात मिळणारे भेसळयुक्तपशुखाद्य यामुळे दुग्धजन्य आजारास पशुधन बळी पडत आहेत. अपूर्ण व्यवस्था, आर्थिक अडचणीमुळे दूध उत्पादकांचे पशुधन दगावण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. लाखो रुपये खर्चून उभे केलेले पशुधन अचानक मृत झाल्यास सर्वसामान्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. अशा कुटुंबासाठी विमा कवच हे पशुधनाच्या जपणुकीसाठी आधार ठरत आहे.
दिवसेंदिवस लाळखुरकत व लम्पी यासारख्या आजाराने डोके वर काढले आहे. आजपर्यंत अनेक पशुपालकांचे पशुधन दगावल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. भेसळयुक्त खाद्य वेगवेगळ्या रासायनिक खतांच्या मोठ्या प्रमाणात पिकांवर होत असलेला मारा यामुळे कमी कालावधीत तयार झालेल्या ओल्या चाऱ्यामुळे अनेक पशुधनाला गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विमा कवच महत्त्वाचे ठरत आहे.