Hutatma Factory Protest : ‘हुतात्मा‌’च्या मासिक बैठकीत गोंधळ

वैभव नायकवडी यांचा बहिष्कार ः वाळव्यात तणाव, अभूतपूर्व बंदोबस्त
Hutatma Sugar Factory Protest
Hutatma Sugar Factory Protest
Published on
Updated on

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याच्या मासिक सभेला कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी उपस्थित राहणार असल्याने सभासदांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या अभूतपूर्व आणि तणावपूर्ण वातावरणात ही सभा पार पडल्याची चर्चा होती.

कारखान्याचे संचालक गौरव नायकवडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मासिक बैठक उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. विशेष म्हणजे, अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी या बैठकीसाठी रजेचा अर्ज दिला होता; मात्र असे असतानाही त्यांनी अचानक पोलिस संरक्षणात सभेला हजेरी लावली. बैठक हॉलमध्ये त्यांच्यासोबत पुत्र वीरधवल नायकवडी हे देखील उपस्थित होते.

सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर उपस्थित सभासदांनी विविध प्रश्नांचा भडिमार सुरू केला. त्यावर, ‌‘बैठकीचे विषय संपल्यानंतर सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली जातील‌’, अशी भूमिका वैभव नायकवडी यांनी घेतली. मात्र, ‌‘आधी प्रश्नांची उत्तरे द्या, मगच सभेचे कामकाज होऊ देऊ‌’, अशी भूमिका विरोधकांनी घेतल्यामुळे वातावरण तापले. अखेर वैभव नायकवडी यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यानंतर उर्वरित संचालकांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज पुढे सुरू राहिले.

याप्रसंगी गौरव नायकवडी व इतर संचालकांनी भूमिका मांडली. संचालक केदार नायकवडी यांनी कारखान्याचा 18 एप्रिल 2026 रोजीचा ठराव बेकायदेशीर पद्धतीने कोल्हापूर येथील एका वकिलामार्फत तयार करण्यात आला आहे, असा आरोप करत संबंधित ठरावाचे वाचन केले. अशी कोणतीही बैठक प्रत्यक्षात कधी झालीच नव्हती, असा दावा त्यांनी यावेळी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news