

वाळवा : घरकुल यादीतील त्रुटी, आठवडा बाजार वसुली, आरोग्य, पाणी कनेक्शन आणि विविध विकास कामांवरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी वाळवा ग्रामपंचायतीची ग्रामसभा अत्यंत वादळी ठरली. आक्रमक ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा भडिमार करत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकाऱ्यांना भंडावून सोडले.
सरपंच संदेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. ग्रामविकास अधिकारी टी. जी. जरग यांनी विषयवाचन केल्यानंतर, मागील ग्रामसभेतील निर्णयांच्या अंमलबजावणीची माहिती देण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यावरून सभेत गोंधळ सुरू झाला.
ग्रामपंचायतीची १२०० लाभार्थ्यांची घरकुल यादी जाहीर झाल्यानंतर यादीतील कथित त्रुटींवरून वाद अधिकच उफाळून आला. माजी उपसरपंच चंद्रशेखर शेळके यांनी यादीतील सुमारे ८०० नावे बोगस असल्याचा आरोप केला. बंगले, चारचाकी वाहने, जमीन आणि नोकरी असलेल्यांची नावे यादीत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. विक्रम शिंदे यांनी, एकाच कुटुंबातील चार-चार व्यक्तींची आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पत्नीचे नाव यात समाविष्ट केल्याचा आरोप केला. प्रत्यक्ष पाहणी न करता पुढार्यांच्या कार्यकर्त्यांची नावे घुसडल्याने ही यादी रद्द करून फेरसर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय अतुल धनवडे यांनी आठवडा बाजाराच्या कराचा हिशेब मागितला, तर विशाल पांगे यांनी नागठाणे व खेड रस्त्याची वादग्रस्त कामे मूळ नकाशाप्रमाणे सुरू करण्याची मागणी केली. सनी अहिर यांनी अवैध दारूविक्री व मटका बंद करण्याची मागणी लावून धरली. सर्व मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल, असे आश्वासन सरपंच संदेश कांबळे यांनी दिले. या सभेला जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी, पंचायत समिती सदस्य प्राची अहिर, उपसरपंच मिलिंद थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.