

आष्टा : आयुष्यभर दरमहा ८० हजार रुपये परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून वाळवा (ता. वाळवा) येथील वृद्धाची १८ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अरविंद कुमार, शरद विष्णू केदार (वय ६२) आणि गोल्डी मॅडम (सर्व रा. पत्ता माहीत नाही) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारुती पोपट शेळके (रा. वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हा फसवणुकीचा प्रकार ऑगस्ट २०१८ ते २३ ऑक्टोबर २०२० या कालावधीत घडला आहे. संशयितांनी फिर्यादी मारुती शेळके यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन केले. ‘तुम्ही जर २० लाख रुपये भरले, तर तुम्हाला दरमहा साधारणतः ८० हजार रुपये परतावा आयुष्यभरासाठी मिळेल’, असे प्रलोभन संशयितांनी फिर्यादींना दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी शेळके यांनी संशयितांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी एकूण १८ लाख ७० हजार रुपयांची रक्कम भरली.
मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर संशयितांनी फिर्यादींना कोणताही परतावा दिला नाही, तसेच त्यांची मूळ रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.