

वाळवा : नवेखेड - वाळवा रस्त्यानजीक वाळवा हद्दीत चरण्यासाठी गेलेल्या मेंढ्यांना विषबाधा झाल्याने ४५ मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. ९ रोजी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मध्यरात्रीपर्यंत तत्काळ उपचार केल्याने ११२ मेंढ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. या घटनेमुळे मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मेंढपाळ शशिकांत शामराव तांदळे, रंगराव शामराव तांदळे, भास्कर रघुनाथ गावडे आणि धैर्यशील तातोबा गावडे यांच्या मालकीच्या मेंढ्या बोरगाव शिवारातील शेतात बसल्या होत्या. शुक्रवारी मेंढपाळ संदीप तांदळे हे मेंढ्या चरण्यासाठी वाळवा हद्दीत घेऊन गेले होते. चरताना मेंढ्यांनी एका शेतातील संकरित ज्वारीचे फुटवे (किराळ) खाल्ले. सायंकाळी वाळवा - नवेखेड रस्त्याने बोरगावच्या दिशेने जात असताना अचानक मेंढ्या रस्त्यात तडफडून पडू लागल्या.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. थोरे, सहायक आयुक्त डॉ. राजीव चंदनशिवे, सहायक आयुक्त खळीकर, डॉ. सचिन वंजारी, डॉ. अमित रेवगडे, डॉ. कपिल खंडाळे, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. प्रकाश कोळी, सुरेश यादव आणि अनिल बनसोडे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोबाईल फ्लॅश आणि टॉर्चच्या उजेडात मध्यरात्रीपर्यंत शर्थीने उपचार सुरू ठेवले. उपचारांपूर्वी २७ व नंतर १८ अशा एकूण ४५ मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर ११२ मेंढ्यांवर यशस्वी उपचार करण्यात आले.
घटनास्थळी आमदार सदाभाऊ खोत, प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सारिका रासकर आणि जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी यांनी भेट देऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त मेंढपाळांना दिलासा दिला.