Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ‌’विरोधात वाळवा तालुक्यात रॅली

भर पावसात हजारो शेतकऱ्यांचा सहभाग : ‌‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द‌’च्या घोषणांनी परिसर दणाणला
Shaktipeeth Highway
‘शक्तिपीठ‌’विरोधात वाळवा तालुक्यात रॅली
Published on
Updated on

ईश्वरपूर/बोरगाव: प्रस्तावीत शक्तिपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातील बाधित गावांमधील शेतकरी आक्रमक झाले असून, गुरुवारी शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीच्यावतीने भव्य निर्धार मोटरसायकल रॅली काढण्यात आली. उभ्या पावसात चिंब भिजत हजारो शेतकऱ्यांनी या रॅलीत सहभागी होऊन शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अशा घोषणा देत शासनाचा तीव्र निषेध केला.

सकाळी सात वाजता बोरगाव (ता. वाळवा) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रॅली बोरगावातून पुढे मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, वाळवा, उरुण-ईश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरळप मार्गे ऐतवडे खुर्द येथे पोहोचली. रॅलीच्या अग्रभागी असलेला चित्ररथ आणि ‌‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द‌’ अशा घोषणांनी संपूर्ण मार्ग दणाणून गेला होता.

शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीचे नेते प्रवीण पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तर गाठ वाळव्याच्या वाघांशी आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. राज्य शासनाने नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग घोषित केला आहे. मात्र, हा मार्ग वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या परिसरातील अत्यंत सुपीक जमिनीतून जाणार असल्याने शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गाच्या उंचीमुळे पावसाळ्यात पाणी साठून जमिनी नापीक होतील आणि दरवर्षी महापुराचा सामना करावा लागेल, अशी भीती यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. संघर्ष समितीचे बी. जी. पाटील यांनीही, जोपर्यंत महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत ही एकी कायम ठेवण्याचे आवाहन केले.

या रॅलीत कामेरीचे सरपंच रणजित पाटील, प्रा. शामराव पाटील, शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीचे नेते प्रवीण पाटील, स्वाभिमानीचे भागवत जाधव, दलित महासंघाचे शंकरराव महापुरे, विजय महाडिक, दिग्विजय पाटील, सुहास पाटील, अनिल पाटील, सरपंच संभाजी पाटील, संपत कांबळे, डॉ. जोत्स्ना पाटील यांच्यासह हजारो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ऐतवडे खुर्द येथे जाहीर सभा

रॅलीचा समारोप ऐतवडे खुर्द येथे जाहीर सभेने झाला. यावेळी धनाजी गुरव म्हणाले की, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन महामार्ग रद्द करावा, अन्यथा मोठा उद्रेक होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news