

ईश्वरपूर : वाघवाडी (ता. वाळवा) फाट्यानजीक दुचाकीला टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत सुनीता संपत पवार (वय ६२, सध्या रा. ईश्वरपूर, मूळ रा. इटकरे, ता. वाळवा) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. अपघातात त्यांचे पती संपत रामचंद्र पवार (वय ६७) हे जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद ईश्वरपूर पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संपत पवार आणि त्यांच्या पत्नी सुनीता पवार हे दोघे दुचाकीवरून इटकरे या मूळ गावी गेले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते इटकरे येथून दुचाकीवरून ईश्वरपूरकडे परत येत होते. वाघवाडी फाट्यानजीक रस्ता ओलांडत असताना भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात सुनीता पवार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती संपत पवार हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात सुनीता यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.