

विटा : आमच्या अंगात शिवाजी महाराज संचार करतात, ते तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील, असे सांगून एका कुटुंबाची शारीरिक व आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून महेश बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत निकम (रा. घोगाव, ता. पलूस, सध्या रा. भवानी माळ, विटा) आणि सूरज उपाध्याय (रा. विटा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विटा येथील पाटील वस्ती परिसरात गेल्या काही काळापासून नव्यानेच आश्रम सुरू झाला आहे. कडेश्वर धाम अध्यात्म संस्था असे या आश्रमाचे नाव. या आश्रमात महेश बाबर, संकेत निकम व सूरज उपाध्याय हे असतात. ते लोकांचे भविष्य सांगणे, राजकीय नेत्यांना सल्ला देणे, विशिष्ठ ठिकाणी अमावास्या, पौर्णिमेस जाऊन पूजा, हवन, जप करण्याचे सल्ले देण्याचे काम करीत होते. पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनाही 1 मार्च 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत आश्रमात आणि त्यांच्या घरी जाऊन या तिघांनी नरबळी व गर्भपाताचे सल्ले देत शारीरिक व आर्थिक फसवणूक केली. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महेश बाबर आणि संकेत निकम यांनी अंगात छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होतो, असे सांगून महाराज तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करतील, असा विश्वास तिला व तिच्या पतीला दिला.
त्यानंतर त्यांनी या कुटुंबाला घरातील संकटे दूर करण्यासाठी वेगवेगळी पूजा, हवन करण्याचे सांगितले, तसेच नरबळी आणि गर्भपात करण्यासारखे अघोरी उपाय सांगितला. या पूजेच्या आणि हवनाच्या खर्चाच्या नावाखाली सूरज उपाध्याय याच्याकडे रोख स्वरूपात मोठी रक्कम देण्यास भाग पाडले. उपचाराच्या नावाखाली फिर्यादीच्या पतीला काठीने बेदम मारहाण केली. या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळानंतर अखेर पीडित महिलेने विटा पोलिस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी विटा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 3(5) आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा महाजन तपास करत आहेत.