Sangli Theft News : विट्यात दोन अट्टल दुचाकी चोरटे जेरबंद; 1 लाख 79 हजारांच्या दुचाकी जप्त
विटा : विटा, पलूस आणि आष्टा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरणारे दोन अट्टल चोरटे पकडण्यात विटा पोलिसांना यश आले. अजित श्रीरंग चन्ने (रा. वलखड, ता. खानापूर) व संकेत तानाजी ढगे (निंबोली, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 79 हजार 900 रुपयांच्या पाच दुचाकी जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले. याबाबत धनंजय बाबासाहेब शिंदे ( विटा ) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली होती.
विटा शहरातील सांगली रस्त्यालगतच्या एका पेट्रोल पंपामागून 2 ऑगस्टरोजी मध्यरात्री दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद धनंजय शिंदे यांनी दिली होती. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पथकातील हेमंत तांबेवाघ, महेश देशमुख यांना विटा-खानापूर रस्त्यावरील हद्दीत दोघे चोरीच्या दुचाकीवरून फिरत असल्याची टीप मिळाली.
गुन्हे प्रकटीकरण पथकामधील पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अजित चांदणे आणि संकेत ढगे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दुचाकीविषयी चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी विटा, आष्टा, पलूस येथून पाच दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून विटा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीचा आदेश दिल्याचे पोलिस निरीक्षक फडतरे यांनी सांगितले. ही कारवाई अमोल पाटील, उत्तम माळी, किरण खाडे, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, राजेंद्र भिंगारदेवे, चंद्रसिंग साबळे, हरी शिंदे, अमोल कदम, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, सतीश आलदर, करण परदेशी, अभिजित पाटील, अजय पाटील यांनी केली.

