Sangli News: विसापूर-पुणदी योजनेला पाणी चोरीचा फटका

चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी; टंचाईमुळे शेतीक्षेत्र धोक्यात
Sangli News: विसापूर-पुणदी योजनेला पाणी चोरीचा फटका
Published on
Updated on

मांजर्डे : तासगाव तालुक्यात आरफळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चोरीचा थेट फटका विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेला बसत असून, पाणीचोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. तालुक्यातून आरफळ, टेंभू आणि ताकारी या योजनांचे पाणी वाहत आहे. यापैकी आरफळ आणि टेंभू योजनेच्या कालव्यांमधून काही अज्ञात व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी केली जात आहे. विशेषतः वंजारवाडी आणि शिरगाव परिसरातील कालव्यांची दारे रात्रीच्या वेळी उघडून पाणी पळवले जात आहे.

तासगाव पूर्व भागातील 31 गावांना शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी विसापूर-पुणदी योजना याच पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, वरच्या भागात होत असलेल्या पाणीचोरीमुळे योजनेला अत्यंत कमी पाणी मिळत आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेती पाणीटंचाईमुळे धोक्यात आली असून, शेतकरी संतप्त झाले आहेत. पाणीचोरी रोखणे प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अज्ञात व्यक्तींकडून रात्रीच्या वेळी उघडलेली कालव्याची दारे शोधणे आणि ती बंद करून पाणीपुरवठा सुरळीत करणे, या प्रक्रियेत साधारण एक ते दोन दिवसांचा कालावधी जातो. यामुळे संपूर्ण पाणी नियोजनाचे वेळापत्रक कोलमडत असून, प्रशासनाला सर्वांपर्यंत पाणी पोहोचवणे कठीण जात आहे.

प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी

कालव्यांची दारे अनधिकृतपणे उघडून होणारी पाणीचोरी थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, पाणीचोरी करणाऱ्यांवर प्रशासनाच्या मदतीने कडक कारवाई करावी, जेणेकरून विसापूर-पुणदी योजनेचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news