

शिराळा : चिखली ता. शिराळा प्राज राजेंद्र पाटील (वय २०) यासह लातूर येथील प्रज्वल तेली, प्रयाग राज येथील चंद्रप्रकाश फूलचंद या तिघांना राजकोट येथील रुग्णालयातील महिलांचा आक्षेपार्ह व्हीडीओ प्रसारित केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ मार्च अखेर पोलीस कोठडी दिली आहे.
या प्रकरणी तपासात प्रयाग राज येथे महाकुंभात स्नान करणार्या महिलांचे व्हीडीओ बनवून युट्युब वर अपलोड केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
देशातील ६० ते ७० रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याचा पोलीसांना संशय असून तपास त्या दृष्टीने सुरू आहे. प्रयाग राज येथील महिलांचे व्हीडीओ अपलोड केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दिशाभूल करणारी माहिती पसरवल्या प्रकरणी ५५ ते ६० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही खाती चालवणा-यांचा शोध सुरू आहे.
राजकोट येथील प्रकरणातील संशयिताकडून महिलांचे आक्षेपार्ह फूटेज आढळून आले आहे. या प्रकरणात जत तालुक्यात एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अहमदाबाद सायबर गुन्हे अन्वेषण विभागाचे केलेल्या तपासात तीन संशयित आरोपी युट्युब व टेलीग्राम चॅनेलवर महिलांचे आक्षेपार्ह व्हीडीओ विकत असल्याचे समोर आले आहे. या मोबदल्यात त्यांनी मोठी रक्कम मिळवली आहे. टेलीग्राम वाहिनी महाराष्ट्रातील लातूर व सांगली येथून कार्यरत होती. याप्रकरणी पोलीस पथक महाराष्ट्र व प्रयागराज येथे तपास करीत आहे.