Sangli Bribery Case: लाचप्रकरणी ग्रामविकास अधिकारी, लिपिकास कोठडी

सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Sangli Bribery Case: लाचप्रकरणी ग्रामविकास अधिकारी, लिपिकास कोठडी
Published on
Updated on

सांगली : गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या साहित्य पुरवठा बिलाच्या मंजुरीसाठी ९५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी महिला ग्रामविकास अधिकारी वर्षा शंकर कदम (वय ४०, रा. खटाव, ता. मिरज) आणि लिपिक शरद दत्तात्रय चौगुले (वय ४०, रा. सिद्धेवाडी) यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

तक्रारदाराने गुंडेवाडी ग्रामपंचायतीला पुरवलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांनी सुरुवातीला १ लाख २८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १७ जून २०२६ रोजी 'एसीबी'कडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे पथकाने १७ जून रोजीच पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान दोन्ही संशयितांनी तडजोडीअंती ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही संशयितांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news