

उध्दव पाटील
सांगली : जीएसटी दराचे 12 टक्के व 28 टक्केचे स्लॅब कमी होऊन त्याअंतर्गत असलेल्या बहुतेक वस्तू अनुक्रमे 5 टक्के व 18 टक्केच्या कक्षेत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचे थेट परिणाम ऑटोमोबाईल क्षेत्रात उमटत आहेत. वाहनांचे बुकिंग फुल्ल झाले आहे, पण विक्री मात्र होईना, अशी स्थिती आहे. जिल्ह्याचा विचार करता, ऑगस्टमध्ये उलाढाल सुमारे 40 ते 50 कोटींनी कमी झाली आहे. दि. 3 आणि 4 सप्टेंबर रोजी होणार्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर जीएसटी दराबाबत स्पष्टता येणार आहे. घोषणेची अंमलबजावणी दसर्यापूर्वी न झाल्यास वाहन विक्रीवर मोठा परिणाम होण्याची भीती ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
सध्या जीएसटीचे सहा स्लॅब आहेत. त्यामध्ये 0.125 टक्के, 3 टक्के, 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक वाहने वगळता सर्व कारवर 28 टक्के जीएसटीसह 1 ते 22 टक्के कॉम्पेन्सेशन टॅक्स आहे. दुचाकी वाहनांना 28 टक्के जीएसटी आहे. मात्र कारवर कॉम्पेन्सेशन टॅक्सही आहे. कारवरील जीएसटी व कॉम्पेनसेशन कर एकूण 29 टक्के ते 50 टक्के आहे. बाराशे सीसी इंजिन क्षमता असलेली लहान पेट्रोल कार, जिची लांबी 4 मीटरपेक्षा कमी आहे, अशा कारला 28 टक्के जीएसटी व 1 टक्का कॉम्पेन्सेशन टॅक्स आहे. पंधराशे सीसी क्षमतेच्या लहान डिझेल कारला 28 टक्के जीएसटी व 3 टक्के कॉम्पेन्सेशन टॅक्स आहे. बाराशे सीसी क्षमतेवरील मध्यम आकाराच्या पेट्रोल कारवर 28 टक्के जीएसटी आणि 15 टक्के कॉम्पेन्सेशन टॅक्स, पंधराशे सीसीवरील व चार मीटर लांबीवरील लक्झरी कारवर 28 टक्के जीएसटी आणि 20 टक्के कॉम्पेन्सेशन टॅक्स, पंधराशे सीसीवरील व चार मीटर लांबीवरील एसयुव्ही (स्पेशल युटिलिटी व्हेईकल) कारवर 28 टक्के जीएसटी व 22 टक्के कॉम्पेन्सेशन टॅक्स आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने सर्वच वस्तू, सेवांंच्या (केवळ वाहने नव्हे) जीएसटी दरात सुधारणा करण्याचा प्रस्ताव जीएसटी कौन्सिलकडे दिला होता. त्यानुसार जीएसटी कौन्सिलने विशेष मंत्री गट नेमला. या मंत्री गटाने जीएसटी कौन्सिलला अहवाल सादर केला आहे. जीएसटी कौन्सिल या अहवालावर विचारविनिमय करेल. त्याअनुषंगाने दि. 3 आणि दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी दिल्लीत जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत जीएसटीच्या दर सुधारणेवर निर्णय होईल. त्यानंतर केंद्र शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध होईल व अंमलबजावणी सुरू होईल. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा केली. त्यामुळे जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
जीएसटीचा 12 टक्के व 28 टक्के कराचा स्लॅब अनुक्रमे 5 टक्के व 18 टक्केमध्ये विलीन होण्याचे संकेत आहेत. सध्या 12 टक्क्यांमध्ये ड्रायफ्रूट्स, ट्रॅक्टर, कपडे, तयार कपडे, चप्पल, बूट, प्रक्रिया केलेले पदार्थ, होम अप्लायन्सेस आदी वस्तूंचा प्रामुख्याने समावेश आहे. 28 टक्के कराच्या स्लॅबमध्ये दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, सिमेंट, बिल्डिंग मटेरिअल, एअरकंडिशनर, टीव्ही, फ्रिज आदी वस्तूंचा समावेश आहे. जीएसटीचा दर कमी होणार असल्याने सध्याच्या 12 टक्के, 28 टक्क्यातील वस्तू स्वस्त होणार, या वृत्ताने संबंधित वस्तू खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांमध्ये खुशी आहे.
आता तर सणासुदीचे दिवस सुरू आहेत. गणेशोत्सव सुरू झाला आहे. दि. 22 सप्टेंबर रोजी नवरात्र सुरू होत आहे. दि. 2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे आणि दि. 22 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा हा एक प्रमुख मुहूर्त, तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त. नवरात्र, दसरा, दिवाळीत वाहन खरेदी जोरात होते. त्यामुळे दुचाकी, कारचे बुकिंग जोरात आहे. मात्र दुचाकी वाहने, कारचा जीएसटी दर 28 टक्क्यांवरून 18 टक्के होणार असल्याची चर्चाही जोरात आहे. तब्बल 10 टक्के कर कमी होण्याच्या शक्यतेने ग्राहकांनी जीएसटी दर कमी होण्याच्या अधिसूचनेची वाट पाहणे पसंद केले आहे. त्यामुळे वाहन खरेदी पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे वाहन वितरक/ विक्रेत्यांना फटका बसू लागला आहे. सांगली जिल्ह्यात दर महिन्याला सुमारे 700 कारची विक्री होते. पण ऑगस्टमध्ये 150 ते 200 कारची विक्री थांबली आहे. बहुसंख्य ग्राहकांनी बुकिंग केलेल्या वाहनांची खरेदी पुढे ढकलली आहे.