

तासगाव : वासुंबे (ता. तासगाव) येथील स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीने अंधश्रद्धेचा प्रकार केला असल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. या प्रकाराने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. व्यावसायिक स्पर्धेतून प्रतिस्पर्धी व्यक्तींवर करणी करून त्यांचे फोटो जाळण्याचा प्रकार झाला आहे. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चारच दिवसापूर्वी मिरज तालुक्यातील बामणोली येथील स्मशानभूमीही अशीच घटना उघडकीस आली होती. असे प्रकार करून दहशत पसरविणार्या व्यक्तींविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘अंनिस’ने केली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील स्मशानभूमीत गावातील एका समाजातील मृत व्यक्तीच्या दशक्रिया विधीसाठी नातेवाईक व ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी जमले होते. त्यांना स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार झाला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तातडीने गावातील काही लोकांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच काहीजणांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली.
स्मशानभूमीत मोठा भोपळा, कवळ, नारळ, लिंबू, बाहुल्या, हळद, कुंकू, सुया, बिब्बा याचा वापर करून काही जणांच्या फोटोचे पूजन केले होते. पूजण्यात आलेले फोटो हे गावातील अनेकांच्या परिचयातील व्यक्तींचे असल्याचे सांगण्यात आले. भोपळा फोडण्यात आले होते. चार जणांच्या फोटोचे पूजन करून ते फोटो अर्धवट जाळले होते. त्याला पांढर्या रंगाने बाहुल्यांचा आकार देण्यात आला होता. कवाळू फळावर चेहर्याचा आकार काढण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीस भेट दिली. अशा अंधश्रद्धेच्या प्रकाराने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अशा प्रकारे जादूटोण्याचा, करणीचा प्रकार करून लोकांमध्ये भीतीचे, दहशतीचे वातावरण तयार करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे. पोलिसांनी असे प्रकार करणार्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. लोकांनीही अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले.