

बागणी : वाळवा तालुक्यातील बागणीसह भागात या हंगामात खरीपाचे क्षेत्र कमी झाल्याचे चित्र आहे. परिसरात साधारणत: भुईमूग, सोयाबीन आदी पिके शेतकरी घेत होता. मात्र यावेळी पाऊस मे महिन्यातच सुरू झाला आहे. परिणामी शेतात पाणी साचले. यामुळे खरीप पिके घेण्याचे भागातील क्षेत्र कमी होत असल्याचे चित्र आहे. मात्र काही शेतकर्यांनी भाजीपाला पीक घेतले आहे. यामुळे आता भागातील क्रॉप पॅटर्न बदलू लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अवकाळी पाऊस आणि आता तर धुके, ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने कोवळ्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. मध्यंतरी या परिसराला पावसाने झोडपून काढले. तर सतत कायम ढगाळ वातावरण असल्याने खरीप पिकावर विविध रोगकिडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहे. रब्बी हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच पण आता खरीप हंगामातील पिकांवर देखील अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचे संकट कायम आहे. पण पुन्हा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे यावेळचा खरीप वाया जाण्याची भीती शेतकर्यांमध्ये आहे. अशा प्रतिकूल वातावरणात कृषी विभागाने शेतकर्यांना आधार देणे गरजेचे आहे.
मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. शिवाय सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने हंगामात पीके अडचणीत आली आहेत. रब्बी पिकांच्या नुकसानीनंतरदेखील शेतकर्यांनी उत्पादन वाढीच्या अनुशंगाने अधिकचा खर्च करुन रब्बी हंगामात पीक पध्दतीमध्ये बदल केला पण निसर्गाचा लहरीपणा हा कायम राहिल्याने हरभरा, गहू या मुख्य पिकांचे नुकसान झाले होते. आता मात्र आठवडयापासून हवामान बदल झाल्याने कोवळ्या पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यासाठी शेतकरी प्रतिबंधात्मक उपायांसाठी कृषी केंद्रात जाऊन महागडे कीटकनाशक खरेदी करीत असले, तरी त्याचा कीडरोगावर प्रभाव पडत नसल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागाकडून दखल घेण्याची मागणी होत आहे. रब्बी पिकावेळी मोठे पर्जन्यमान झाल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला होता. परिणामी लांबलेल्या पावसामुळे यंदा पेरण्या होणारच नाहीत, असे वाटत असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली.