

मिरज : निखिल कलगुटगी खुनातील संशयितांवर मिरज शासकीय रुग्णालयात हल्ला करण्यासाठी आलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सर्वांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यापैकी मुख्य संशयितासह तिघांच्या कोठीत वाढ करण्यात आली, तर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य सूत्रधार वंश वाली, वैभव आवळे, सौरभ पोतदार यांचा समावेश आहे, तर समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे या दोघांची न्यालयायीन कोठडीत रवानगी करण्यात आली. खुनी हल्ल्याच्या प्रयत्नातील वंश वाली याचा भाऊ कुणाल वाली याचा फेब्रुवारीमध्ये खून करण्यात आला होता, तसेच दि. 27 सप्टेंबररोजी निखिल कलगुटगी याचा खून करण्यात आला होता. कलगुटगी खुनात सलीम पठाण व चेतन कलगुटगी हे मुख्य सूत्रधार आहेत. या दोघांसह अन्य दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
वंश वाली याने पिस्तूल घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला होता, तर अन्य चौघे संशयित कोयता घेऊन रुग्णालय आवारात आले होते. याची चाहूल लागताच पोलिसांनी वंश याला अटक केली. त्यानंतर अन्य संशयितांनी कोयता घटनास्थळीच टाकून पलायन केले होते. त्यांना नंतर अटक करण्यात आली. सर्वांची कोठडी शनिवारी संपली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. वंश वालीसह तिघांकडे पुढील तपास करायचा असल्याने त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली, तर दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.