

वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यासमोर आंदोलनासाठी बसलेल्या संतप्त आंदोलकांनी काल सातव्या दिवशी अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या केबिनला टाळे ठोकून संताप व्यक्त केला. आंदोलकांचे नेते गौरव नायकवडी, केदार नायकवडी आणि किरणदादा नायकवडी यांनी, उद्यापासून आंदोलनाची दिशा बदलून ते अधिक तीव्र करण्याचे जाहीर केले.
काल सकाळपासूनच कारखाना कार्यक्षेत्रातील 15 गावांतील सभासद आणि शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. दिवसभर लोक संतप्त भावना व्यक्त करीत, विद्यमान अध्यक्षांनी कसा-कसा त्रास दिला हे सांगत होते. उमेश घोरपडे, सनी अहिर, संजय अहिर, डॉ. प्रकाश भोसले, प्रताप पाटील, शशिकांत शेळके, ॲड. वरुण माने आदींची भाषणे झाली.
गौरव नायकवडी म्हणाले, जर एकाही आंदोलकाला त्रास झाला, तर सुट्टी देणार नाही. कँटीन बंद करू नका, कुस्त्या बंद करू नका म्हणून काकांना विनंती केली. त्यांनी कधी ऐकले नाही. मिळेल त्यात पैसा हाणला. अण्णा फुकट आंबे वाटत होते, यांनी बझारमधून ते विकून पैसा केला. मी किंवा माझ्या घरातील कोणीही अध्यक्ष होणार नाही, मला पुन्हा अण्णांनी निर्माण केलेले दिवस परत आणायचे आहेत, असे म्हणाले; तर अजितदादा म्हणाले होते, गौरव अण्णांचे काय वैभव ठेवतोय का नाही? जेलमध्ये बसावे लागेल याचे भान काकांनी ठेवावे. लवकरच आम्ही काकाविरोधात एफआरआय दाखल करणार आहे. संबंधित विभागाने दाखल करून घेतला नाही, तर सारे शेतकरी त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला.
केदार नायकवडी यांनी, क्रांती कारखाना आणि हुतात्मा कारखाना यांच्या अहवालाची तुलना सांगून, कोट्यवधी रुपये वैभवकाकांनी कसे हाणले हे सांगितले, तर किरणदादा नायकवडी यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला.
काकांच्या ॲग्रीनित्यम कंपनीने काका, काकी आणि त्यांच्या नातेवाईकांनी हुतात्मा कारखाना आणि बझारची कशी लूट केली याची माहिती ॲडवरून माने यांनी आकडेवारीसह दिली. कायदेशीर चौकशी सुरू असून लवकरच त्याचा अहवाल मिळेल असे ते म्हणाले. काकांच्या कंपनीने 2638 कोटी रुपयांची उलाढाल केल्याची कागदपत्रे मिळाल्याची माहिती दिली. उद्यापासून निवृत्त कामगार आणि सर्व शेतकरी, सभासद मिळून कारखाना स्वच्छ करतील, अशी घोषणा गौरव नायकवडी यांनी केली. काल रात्री 8 वाजेपर्यंत तुफान गर्दी झाली होती.