

कवठेएकंद : अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्यामुळे दोघेजण जागीच ठार झाले. अशोक जगन्नाथ पाटील (वय 59, रा. काकडवाडी, ता. मिरज, जि. सांगली) व प्रकाश शिवाजी पाटील (55, रा. कांचनपूर, ता. मिरज, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. तासगाव-सांगली रस्त्यावरील कवठेएकंद हद्दीतील जय शीतला कोल्ड स्टोअरेजजवळ ही घटना घडली.
शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अशोक व प्रकाश हे काम आटोपून तासगावहून आपल्या गावी काकडवाडीच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच 10 सीडब्लू 4759) निघाले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकरले. यात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर जोरात आपटले. त्यांना गंभीर दुखापत होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या घटनेची नोंद तासगाव पोलिसात झाली आहे. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. कांचनपूर, काकडवाडी गावावर शोककळा पसरली.
तासगाव-सांगली मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेक वर्षांपासून या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. त्यातच रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे वारंवार पडत असतात. सध्याही खड्डे आहेत. याकडे प्रशासन कधी लक्ष देणार? रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे सावधानतेचे फलक नाहीत. यामुळे या मार्गावर छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. असे वारंवार होणारे अपघात कोण रोखणार?