

विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा पोलिसांनी एका गुन्ह्याच्या तपासात तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले. या प्रकरणी दोन संशयितांकडून त्यांच्याकडील रोख रकमेसह ६ लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ओंकार हणमंत बोडरे (वय २०, ताकारी, ता. वाळवा ) आणि विशाल उर्फ आकाश भिमाशंकर जाधव (वय २४, सोन्याळ, ता. जत) अशी या दोघांची नावे असून त्यांचा साथीदार आकाश दीपक घाडगे (तुपारी, ता.वाळवा) हा फरार झाला आहे.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, विट्यातील सूर्यनगर येथील राहणारे प्रकाश बंडू सूर्यवंशी यांनी त्यांच्या शेळ्या चोरी झाल्याची फिर्याद पाच महिन्यांपूर्वी दिली होती. त्यानुसार अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. रात्री अकरा वाजता विटा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उत्तम माळी यांना खब-याद्वारे दोन तरूण विनानंबर प्लेटच्या दुचाकीवरून विटा-आळसंद रस्त्यावरून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे असणारी दुचाकी आटपाडी येथून चोरल्याची तसेच ७६ हजार रुपये किंमतीच्या दहा शेळ्या, पन्नास हजाराची दुचाकी, वीस हजाराची पाण्यातील विद्युत मोटर, रोख सात हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. वरील साहित्य आणण्यासाठी वापरण्यात आलेली पाच लाख रुपयांची चार चाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उत्तम माळी, अमोल कराळे, हेंमत तांबेवाघ, सुनील पाटील, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, कॅप्टनसाहेब गुंडवाडे, अजय पाटील यांनी केली.