

सांगली : जत तालुक्यातील उमराणी आणि वाळवा तालुक्यातील बागणी येथील प्राथमिक शाळांतील वर्गखोल्यांची बांधकामे निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे. उमराणी शाळेसंदर्भात जिल्हा परिषदेेने जतच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.
उमराणीमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील वर्गातील छत रविवारी, दि. २६ जुलैरोजी कोसळले. मात्र यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या अडीच- तीन वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम झाले आहे. ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामाच्या दर्जाच्या चौकशीची मागणी केली आहे. गटशिक्षणाधिकारी राम फरांडे यांनीही जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार दुर्घटनेची गंभीर दखल घेत चौकशी अहवाल तयार केला आहे.
दरम्यान, बागणी (ता. वाळवा) येथेही नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीत गळती सुरू झाली आहे. नियोजन समितीतून मुलींच्या शाळेसाठी इमारत मंजूर झाली असून सध्या तिचे बांधकाम सुरू आहे. मात्र त्याच्या खोल्यांना पहिल्याच पावसात गळती लागली आहे. बांधकाम निकृष्ट असल्याने चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या दोन्ही शाळांच्या कामांची पाहणी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केली असून चौकशीही सुरू केली आहे.