सांगली : घरासमोरील रस्त्यावर खेळणाऱ्य दोन वर्षांच्या चिमुकलीचा चुलत्याच्या मोटारीखाली सापडून मृत्यू झाला. कर्नाळ रोडवरील साईनाथनगर येथे मोटार मागे घेत असताना ही थरारक घटना घडली. या भीषण अपघातात ओवी सागर साळुंखे (वय २ वर्षे, रा. साईनाथनगर, सांगली) या चिमुकलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीचे वडील सागर चंद्रकांत साळुंखे (वय ३५) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास साईनाथनगर गल्ली क्रमांक २ मध्ये ही घटना घडली. फिर्यादींचा लहान भाऊ प्रशांत चंद्रकांत साळुंखे (३१, रा. संगमेश्वरनगर, सांगली) हा मोटार गाडी (एमएच ११ बीएच ६१७०) पार्किंगसाठी घेऊन जात होता. त्यावेळी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने गाडी अचानक वेगाने पाठीमागे घेतली.
यामुळे रस्त्यावर खेळणारी ओवी गाडीच्या मागील चाकाखाली सापडली. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशांत साळुंखे याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सांगली शहर पोलिस तपास करत आहेत.