

सांगली : पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि आयएसआय हँडलर शहजाद भट्टी तसेच भारतातील कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्या सोशल मीडियावरील वेब पेजेसना लाईक करणे जिल्ह्यातील दोन तरुणांना चांगलेच महागात पडले. या संशयास्पद हालचालींची गंभीर दखल घेत दहशतवादविरोधी पथकाने जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
भट्टी आणि बिष्णोई यांच्या सोशल मीडिया नेटवर्कशी संबंधित असलेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी 'एटीएस'ने राज्यभरात विविध ठिकाणी छापे टाकले. या मोहिमेदरम्यान सोलापूर एटीएसच्या पथकाने अत्यंत गोपनीयरीत्या सांगली जिल्ह्यातील दोन तरुणांना ताब्यात घेतले. या कारवाईची स्थानिक पोलिसांनाही माहिती नव्हती.
एटीएसने भविष्यात अशी चूक न करण्याची तंबी देत दोघांचे रीतसर जबाब नोंदवून घेऊन त्यांना सोडून दिले. मात्र, सोशल मीडियावरील केवळ एका 'लाईक'मुळे थेट एटीएसच्या चौकशीला सामोरे जावे लागल्याने, हा प्रकार सध्या जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय बनला.