

सांगली : थकीत घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने दहा ठिकाणी कारवाई केली. आठ मालमत्ताधारकांनी रोख व धनादेशाद्वारे 16.21 लाख रुपये भरले. दरम्यान, रक्कम न भरलेल्या 2 मालमत्ता सील करण्यात आल्या. घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेची मोहीम सुरूच राहणार आहे.
महापालिकेच्या पथकाने बुधवारी दहा ठिकाणी कारवाई केली. प्रलंबित कर भरण्यास सातत्याने नकार दिल्यामुळे दोन खासगी मालमत्ता सील करण्यात आल्या. सांगलीतून 9.29 लाख रुपये, कुपवाडमधून 4.40 लाख रुपये, तर मिरजेतून 2.52 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. नागरिकांनी थकीत कर त्वरीत भरावा. जप्ती, सील व दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन महापालिकेतून करण्यात आले.