Sangli Theft : आष्ट्यात एकाच दिवशी दोन घरफोड्या

सोन्याचे दागिने, चांदीची नाणी व रोकड लंपास ; लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
Theft
TheftFile Photo
Published on: 
Updated on: 

आष्टा : आष्टा शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीची नाणी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे, दोन्ही घरांमध्ये लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने आणि पैसे चोरट्यांनी लक्ष्य केले. घराचे दरवाजे उघडे असल्याची संधी साधून सकाळच्या सुमारास झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पहिली घटना शिराळकर कॉलनीतील महाजन प्लॉट परिसरात ९ नोव्हेंबररोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. किरण गुरुलिंग महाजन (वय ६९) यांच्या ‘गुरुकृपा’ बंगल्यातील हॉलमधील टेबलवर लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेली २५ ग्रॅम वजनाची सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ आणि १२ हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

दुसरी घटना केशवनाथ गल्ली येथे घडली. अभिजित चंद्रकांत लांडे (वय ३८, व्यवसाय : सिव्हिल इंजिनिअर) यांच्या घरातूनही सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. देवघरात लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले १४.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (४२ हजार रुपये), ११.४०० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र (३५ हजार रुपये), १० ग्रॅम वजनाची आठ चांदीची नाणी (४ हजार रुपये) आणि ८ हजार रुपये रोख, असा एकूण ८९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) नुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.