

सांगली : सांगली-आष्टा रस्त्यावर तुंग (ता. मिरज) गावाजवळ भरधाव चारचाकीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. ही घटना बुधवार (दि. 25) रात्री मिणचे मळा परिसरात घडली. सुनीता रवींद्र परीट (वय 35, रा. बालाजी मंदिरानजीक, मिरज) आणि संजय गोपाळ धुमाळ (56, रा. म्हैसाळ वेस, मिरज) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत माहिती अशी की, मृत संजय धुमाळ आणि सुनीता परीट हे दोघे दुचाकीवरून (एमएच 10 बीडब्लू- 0260) आष्टा येथे गेले होते. सायंकाळी ते परत सांगलीकडे येत होते. तुंग येथील मिणचे मळ्यानजीक ते आले असता पाठीमागून वेगाने आलेल्या चारचाकीने (एमएच 01-बीजी 1980) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. रस्त्यावर फेकले गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही नागरिकांनी तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. सुनीता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर संजय धुमाळ यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला होता. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सांगली-इस्लामपूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने भरधाव वेगाने जातात. अनेक ठिकाणी अंडरपास नाहीत, गतिरोधक नाहीत. सुसाट वाहनांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. तुंग, कसबे डिग्रज, समडोळी फाटा हे अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे.