तासगाव : वडिलांबरोबर जनावरे चरण्यास गेलेल्या अडीच वर्षे वयाच्या बालकाचे अपहरण करण्यात आले. पाडळी (ता. तासगाव) येथून बालकाचे अपहरण झाल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी तासगाव पोलिसात दाखल केलेली आहे. शंभूराज शशिकांत पाटील असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे.
यासंबंधी शशिकांत रावसाहेब पाटील (रा. धामणी, सध्या रा. पाडळी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी (दि. 5) सकाळी 11 वाजता शशिकांत हे शेळ्यांना चरण्यास घेऊन शेतात गेले होते. यावेळी मुलगा शंभूराजही बरोबर होता. दुपारी शशिकांत यांच्या ओळखीचे विश्वास पाटील व चेंड्याभाऊ जवळ आल्याने शशिकांत त्यांच्याबरोबर बोलत बसले होते. यावेळी शेतात बांधलेली जनावरे जागा बदलून बांधण्यासाठी शशिकांत गेले. सुमारे पाचच्या सुमारास ते मुलगा शंभूराज खेळत असलेल्या ठिकाणी परत आले असता, त्यांना त्या ठिकाणी शंभूराज दिसला नाही. पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, पोलिस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांच्या पथकाने घटनास्थळी शोधमोहीम राबविली. सांगलीहून एनडीआरएफची टीम व ड्रोनच्या साहाय्याने शोध घेतला. पण तो सापडला नाही. अखेर पोलिसांना अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा लागला.

