

सांगली; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या व गुन्ह्यामध्ये मदत करणार्या महिलेस प्रत्येकी 10 वर्षे सक्तमजुरी व दोघांमध्ये 75 हजार रुपये दंडाची शिक्षा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे आरती देशपांडे-साठविलकर यांनी काम पाहिले.
शैला देवदासी भोरे ( वय 49, रा. काननवाडी, ता. मिरज) व रोहित हणमंत आसुदे (वय 25, रा. गावठाणभाग, नागठाणे, ता. पलूस) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दंडापैकी 50 हजार रुपये पीडित मुलीला भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, पीडित मुलगी हिला शिक्षणासाठी शैला भोरे हिने घरी घेऊन गेली होती. त्यानंतर ती घरातील काम करत नाही, अशा किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करू लागली. पीडित मुलीला नाचण्याचे, देवाची गाणी म्हणायचे काम करण्यास ती भाग पाडू लागली. त्याचबरोबर जोगव्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तिला नाचकाम, देवाची गाणी म्हणण्यास जबरदस्ती करत होती. काम करण्यास नकार दिल्यावर शैला तिला मारहाण करत होती.
ऑक्टोबर 2017 मध्ये शैला भोरे हिने पीडित मुलीस बुर्ली (ता. पलूस ) येथे उरुसासाठी घेऊन गेली होती. तिथे ती एका ओळखीच्या महिलेच्या घरी राहिली. तिथे शैला भोरे हिने रोहित याच्याशी पीडित मुलीची ओळख करून दिली. 'हा मुलगा आपल्या जोगव्याच्या फडामध्ये यायला पाहिजे. त्यासाठी तू त्याला भुरळ घाल व त्याच्याशी संबंध प्रस्थापित कर, नाहीतर तुला मारून टाकीन' अशी धमकी दिली.
त्यानंतर रोहितने पीडित मुलीबरोबर जबरदस्तीने संबंध केले. त्यानंतर दुसर्या दिवशी मुलीस त्रास होत होता, पण शैला तिला कोणत्याही दवाखान्यात घेऊन गेली नाही. त्यानंतर पीडित मुलीस घेऊन शैला तिच्या घरी काननवाडी येथे आली. काही दिवसातच किरकोळ कारणावरून वाद करून शैलाने पीडित मुलीच्या पायाला बेडीने बांधले व झोपडीच्या छतास लोखंडी बारला उलटे लटकवून तिच्या अंगावर, पायावर काठीने मारहाण केली. त्यावेळी शैलाचा मुलगा तिला असे न करण्याबाबत वरचेवर समजावत होता. परंतु शैला पीडित मुलीला त्रास देतच होती. या त्रासाला कंटाळून पीडित मुलगी मालगाव येथे राहायला गेली होती. त्यावेळी शैला तिथे जावून तिने मुलीस परत काननवाडी येथे घेऊन आली व पुन्हा तिने लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली.
दि. 11 जुलै 2019 रोजी शैला पीडित मुलीस घेवून पंढरपूर येथे गेली व वयस्कर काळ्या माणसाला भेटून त्याच्याशी लग्न कर, त्याच्याकडून सोने व इतर वस्तू मागून घे, असे सांगितले. पीडित मुलीने तिला नकार दिला म्हणून पीडित मुलीस तिथेच सोडून शैला आपल्या गावी निघून आली. त्यावेळी पीडित मुलीने भीक मागून रेल्वे तिकीटासाठी लागणारे पैसे गोळा केले. कोणताही पर्याय नसल्यामुळे ती पुन्हा शैलाच्या घरी आली.
त्यावेळी पुन्हा आरोपीने तिला झाडावर बांधून घातले. काठीने निर्दयपणे मारहाण केली. शेवटी पीडित मुलीने तिच्या तावडीतून सुटका करून घेतली. कुपवाड पोलिस ठाण्यामध्ये या आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज उबाळे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले.
याप्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी मोर्चे, आंदोलन करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी साक्षी, पुरावे गोळा करून खटला ताकदीचा बनविला. सरकारपक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी व वैद्यकीय अधिकारी यांचा जबाब महत्वपूर्ण ठरला. कुपवाड पोलिस ठाणे येथील अशोक भगवान कोळी, पैरवी कक्षातील सुनीता आवळे, वंदना मिसाळ, दीपाली सूर्यवंशी यांनी सरकार पक्षाला मदत केली.