Sangli Robbery Case: बंदुकीच्या धाकाने ट्रक अडवून नऊ लाखांची लूट

भिवर्गी फाट्यावर तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांवर हल्ला
Sangli Robbery Case: बंदुकीच्या धाकाने ट्रक अडवून नऊ लाखांची लूट
Published on: 
Updated on: 

जत शहर : माडग्याळ (ता. जत) येथील बाजारासाठी मेंढ्या खरेदीसाठी येणाऱ्या तामिळनाडूमधील व्यापाऱ्यांवर शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. तिकोंडी-संख रोडवरील भिवर्गी फाट्याजवळ ट्रकच्या समोर मोटार आडवी लावून सात ते आठ दरोडेखोरांनी व्यापाऱ्यांना मारहाण करत ९ लाख रुपयांची रोकड व मोबाईल लंपास केले.

याप्रकरणी एम. रवी (वय ६०, रा. सेलम, तामिळनाडू) यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांत ९ लाखांची रोकड लुटल्याची फिर्याद दाखल असली, तरी प्रत्यक्षात दरोडेखोरांनी मोठी रक्कम लुटल्याची चर्चा आहे. तामिळनाडू राज्यातील सेलम येथील पाच व्यापारी, दोन चालक आणि तीन हमाल एका ट्रकमधून (क्र. केए ५१ एए ७२७९) माडग्याळ बाजाराकडे येत होते. पहाटे भिवर्गी फाट्याजवळ अचानक एका आलिशान मोटारीने त्यांचा ट्रक अडवला. ७ ते ८ जणांनी चाकू व बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना मारहाण केली.

दरोडेखोरांनी ट्रक निर्जन भागात नेऊन ट्रकमधील लोखंडी पेटी टॉमीने तोडली आणि त्यातील ९ लाख रुपयांची रोख रक्कम आणि दोन मोबाईल लंपास केले. दरोड्यानंतर संशयितांनी मोटारीतून पलायन केले.

कर्नाटकात तपासाची चक्रे फिरवली

घटनेनंतर व्यापाऱ्यांनी तातडीने उमदी पोलिस ठाण्यात धाव घेतली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरोडेखोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह उमदी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असून, जत तालुक्यासह लगतच्या कर्नाटकातील विजयपूर परिसरातही शोधमोहीम राबवली जात आहे.

दरोड्याचा गुन्हा दाखल

दरोडेखोरांच्या मारहाणीत एक व्यापारी किरकोळ जखमी झाला आहे. बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लूटमार केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांचा तातडीने शोध घेतला जाईल, अशी माहिती उमदी पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news