सांगली : जतपूर्व भागात सर्रास वृक्षतोड

सांगली : जतपूर्व भागात सर्रास वृक्षतोड
Published on
Updated on

माडग्याळ; पुढारी वृत्तसेवा :  जतपूर्व भागात सर्रास वृक्षतोड होत आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
जत पूर्वभागात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. दररोज चार ते पाच वाहने लाकडे घेऊन ट्रक व ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत आहे. संबंधित अधिकारी तसेच वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे वरिष्ठस्तरावरून लक्ष देऊन वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

जत तालुक्यात जाडरबोबलाद, सोन्याळ, माडग्याळ, सनमडी, कुणीकोनूर, संख, उमदी, उटगी आदी भागात लिंब, बोर व इतर झाडांची कत्तल केली जात आहे. जत तालुका दुष्काळी म्हणून गणला जातो. शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीचा गैरफायदा अनेक व्यापारी घेत आहेत. यातून बेसुमार झाडांची कत्तल केली जात आहे. सर्व झाडाचे लहान तुकडे करून सायंकाळी ट्रकमध्ये भरून इचलकरंजी व इतर ठिकाणी पाठवले जाते. तसेच मोठ्या झाडाचे मोठे तुकडे करून दिवसा ट्रॅक्टरमधून वाहतूक केली जात आहे. तीदेखील खुलेआम केली जात आहे.

मौल्यवान झाडे नामशेष

या सार्‍या परिसरात प्रमुख झाडांमध्ये आंबा, चिंच, बोर, जांभूळ, बाभळ आदी जातीच्या झाडांची बेसुमार तोड केली जाते. अनेक मोठ्या गावांमध्ये लाकूड माफियांच्या टोळ्या तयार झालेल्या आहेत. तोडलेल्या झाडांची लाकडे ट्रकमध्ये भरून सर्रास बाहेर पाठविली जातात. हा सगळा गैरप्रकार खुलेआम होत आहे.

लाकूड माफियांची वक्रदृष्टी

जत तालुक्यातील वनक्षेत्रावर लाकूड माफियांनी एकप्रकारे डल्लाच मारला आहे. जतपूर्व भागातील वनक्षेत्रावर देखील लाकूड माफियांची वक्रदृष्टी पडलेली आहे. एकीकडून शासन दरवर्षी लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण करते. मात्र, दुसरीकडे लाखो झाडांची कत्तल केली जात आहे. तरीदेखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे.

सातत्याने राहिलेला दुष्काळ, अत्यल्प पाऊस, टंचाई आदी नैसर्गिक संकटे ही पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचे अधोरेखित करतात. यामुळे वृक्षारोपण, त्याचे संगोपन आणि संवर्धन करण्याची नितांत गरज आहे. परंतु, शासन स्तरावर राबविली जात असतेली वृक्षलागवड मोहीम केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार होत असल्याची टीका होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news