

सांगली : येथील वसंत मार्केट यार्ड परिसरातून निर्यातीसाठी पाठवलेल्या ५४ टन हळकुंडाची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विल्हेवाट लावून ९१ लाख १३ हजार ४७२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन आंतरराष्ट्रीय व लॉजिस्टिक कंपन्यांचे चालक, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वसीम शब्बीर फकीर (वय ४२, रा. कुपवाड रोड, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. फकीर यांच्या कंपनीचे वसंत मार्केट यार्ड येथील टेंडर्स कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. या कार्यालयातून ९ फेब्रुवारी २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत ५४ टन हळकुंड निर्यातीसाठी पाठवण्यात आले होते. या मालाची एकूण किंमत ९१ लाख १३ हजार ४७२ रुपये होती.
निर्यातीची प्रक्रिया सुरू असताना 'झम झम अल बहार फिश ट्रेडिंग कंपनी', 'द्विमॅक्स शिपिंग कंपनी' आणि 'वेस्टविंड शिपिंग कंपनी अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड' या कंपन्यांच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी आपापसात संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. या बनावट कागदपत्रांचा गैरवापर करून ५४ टन हळकुंडाचा माल परस्पर सोडवून घेत फिर्यादीच्या कंपनीची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून बँक स्टेटमेंट, संबंधित कागदपत्रे तसेच सर्व व्यवहारांची तांत्रिक तपासणी सुरू आहे.