

सांगली : शहरातील १०० फुटी रस्त्यावरील शांतीसागर कॉलनी परिसरात दुचाकीवरून घरी जाणाऱ्या एका व्यापाऱ्याला अडवून, कोयत्याचा धाक दाखवत मोटारीतून अपहरण करून ५ लाख ८७ हजार १८८ रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
याप्रकरणी प्रशांत मधुकर रावळ (वय ५१, रा. मामाश्री बंगला, शांतीसागर कॉलनी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रशांत रावळ हे २ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. शांतीसागर कॉलनीतील प्रकाश कोळी यांच्या बंगल्यासमोर येताच नंबर नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. पाठोपाठ मोटारीतून आलेल्या दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली व बळजबरीने मोटारीत बसवले. तोंडावर काळी पिशवी घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत १२ ते १५ किलोमीटर अंतरावर नेले.
तेथे त्यांच्या गळ्यातील ४ लाख ९४ हजार ४८८ रुपयांची सोन्याची साखळी व पदक, प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ४० हजार रुपयांचा मोबाईल आणि २ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम, असा एकूण पावणेसहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जबरीने काढून घेतला. त्यानंतर रावळ यांना रस्त्याच्या कडेला एका शेतात फेकून संशयित मोटारीतून पसार झाले.